बिकट परिस्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहिलेली धुळेपल्ली येथील संगीता येणार शिक्षणाच्या प्रवाहात !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेली  धुळेपल्ली येथील  संगीता लालसु वेळंजे ही मुलगी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. 
 काल  २८ जुन रोजी  सकाळी १०  वाजता दाखलपात्र विद्यार्थी भरती पंधरवाडा या उपक्रमांतर्गत जि.प.प्राथ शाळा धुळेपल्ली ,केंद्र-ताडगाव येथे भेट दिली. भेटीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके,नवागतांचे स्वागत,शाळेतील विद्यार्थी-शिक्षक संवाद,आव्हाणे व उपाययोजना, तसेच गावातील शिक्षणापासुन वंचित राहात असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध,कारणांचा शोध या अनुषंगाने  भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विणी सोणावने यांच्या मार्गदर्शनात साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी धुडेपल्ली गावी भेट देऊन सर्व्हेक्षण केले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा राऊत यांच्या कडुन माहिती मिळाली असता  संगिता लालसु वेळंजे ही मुलगी एक वर्षापासून शिक्षणापासुन वंचित असल्याचे दिसून आले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने संगिताला पुढचे शिक्षण घेता आले नाही. तसेच पालक निरक्षर असल्याने आणि लहान भावंडाचा सांभाळ करावयाचे असल्याने लालसू वेळंजे ह्यांनी संगीताने पुढचे शिक्षण घ्यावेत असे वाटत नव्हते.  सोरते यांनी लालसू यांचेशी संवाद साधल्यानंतरही संगीताने  शिक्षण घ्यावे या विचारात ते अजिबात नव्हते.
 परंतु सर्व प्रकारच्या समस्या ह्या केवळ समजदारीनेच सुटतात,कारण समजदारी मानवाला समाधानी बनवू शकतो.हे ही तितकेच खरे आहे.साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी गावातीलच अंगणवाडी सेविका रंजना मट्टामी आणि महिला सरपंचा सोनू मडावी ह्यांच्या मदतीने लालसू यांची स्थानिक माडिया भाषेत संवाद साधला.समज घातल्यानंतर संगीताचे वडील संगीताला शाळेत प्रवेश मिळावे आणि संगीता पुढचे शिक्षण घ्यावे यासाठी तयार झाले.त्यावेळेसचा आपला आनंद गगनभेदीच होता.
      शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ नुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना शिक्षण मिळावे हे अपेक्षित आहे.संगीताच्या गावी चौथी नंतरचे शिक्षण नसल्याने ती  इच्छा असुनही परिस्थितीमुळे आणि पालकांच्या नकारात्मकतेमुळे शिक्षण घेऊ शकली नाही.परंतू संगीताच्या शिक्षणाकरीता आपण काही स्वयंसेवी सामाजिक संस्थाशी संवाद साधून संगीताला साईकिल उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आणि आशा आहे की संगीताला काही दिवसातच पुढचे शैक्षणिक पाऊल इतर मुलींसारखेच मिळणार याच खात्रीने संगीताचे पालक तिला शाळेत घ्यालण्यासाठी तयार झाले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-29


Related Photos