दिव्यांग बांधवांनी घेतले शेळीपालनाचे धडे


- आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचा पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दिव्यांग व्यक्ती प्रत्येक गावात दिसून येतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासकीय, निमशासकीय स्तरावर प्रयत्न होत आहेत. परंतु गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात दिव्यांगांच्या समस्या काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी या कुरखेडा येथील संस्थेने पुढाकार घेतला आहे. दिव्यांग बांधवांना संस्थेच्या माध्यमातून शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
मागील काही वर्षांपासून  संस्था डाॅ. सतीश गोगुलवार आणि शुभदाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अधिकार, व्यावसायीक पुनर्वसनासाठी काम करीत आहे. आज दिव्यांगांच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली , चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये व्यापलेले आहे. या क्षेत्रातील बऱ्याचशा दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना विविध व्यवसायाचे , रोजगाराचे प्रशिक्षण देवून त्यांना व्यवसायासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येत असते. यासाठी दिव्यांग सामाजिक उद्योजकता आणि रोजगार निर्मिती प्रकल्पांतर्गत १६ , १७ , १८ जून रोजी राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र येरंडी येथे दिव्यांगांचे ३ दिवसीय निवासी शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी ब्रम्हपुरी, वडसा, कुरखेडा, नागभिड, आरमोरी या तालुक्यातीनल  बरेचसे दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्यामध्ये दिव्यांगांना शेळीपालन व्यवसायाचे फायदे, महत्व, शेळ्यांच्या जाती, चारा पाणी व्यवस्थापन, रोग, आजार, औषधोपचार, लसीकरण , विमा, शासकीय योजना अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. 
डाॅ. हजारे यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी प्रकल्पाचे समन्वयक मुकेश शेंडे, संगिताताई तुमडे आणि मनोज मेश्राम यांनीही अंतर्गत बाबी समजावून सांगितल्या. प्रशिक्षणासाठी प्रकल्पाचे कार्यकर्ते लक्ष्मण लंजे, महेश निकुरे, निशाताई जांभुळकर यांनी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-29


Related Photos