विद्यापीठ कर्मचारी महासंघाचा १५ जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा, आज लाक्षणिक संप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने १५ जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. यामुळे या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल ६० लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. याच मागण्यांसाठी आज  २९ जून रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संपही करण्यात येणार आहे. 
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील व अशासकीय कॉलेजांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन संरचना लागू झालेली नाही. सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करण्यासह अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य २६ मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम या तीन महासंघांकडून पाठपुरावा सुरू आहे. उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येत नसल्याने तिन्ही संघटनांनी २९ जुलै रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा इशारा दिला आहे. या संपानंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास १५ जुलैपासून राज्यातील अकृषी विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा महासंघांने दिला आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-06-29


Related Photos