पुण्यात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू


वृत्तसंस्था / पुणे :  पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची सरंक्षण भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.   ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. 
घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते, अशी माहिती समोर आलीय.  बडा तालाब मस्जिद पसरिसरात अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचं काम सुरू होतं. इमारतीचा पाया बांधण्यासाठी ४० ते ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या अल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. पण पावसामुळे सोसायटीची पार्किंगची संरक्षण भिंत खचून ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. बांधकाम प्रकल्प कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-29


Related Photos