मानवी तस्करीचा प्रकार वकील महिलेने केला उघड, ३३ मुले आढळली, आठ युवक ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर
: हावड्यावरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाडीत तब्बल ३३  अल्पवयीन मुलांना नंदूरबारला घेऊन जात असल्याचा प्रकार एका वकील महिलेच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. या प्रकरणी आठ युवकांना ताब्यात घेण्यात आले.  यातील मुलांना राजनांदगाव येथे उतरवण्यात आले.
हावडा एक्सप्रेसमध्ये ८ ते १२ वर्षांची मुले एकत्र बसली होती. या बोगीत रायपूर येथून एक महिला वकील चढल्या. त्यांना इतक्या मोठय़ा प्रमाणात लहान मुले एकत्र असल्याने शंका आली. त्यांच्यासोबतच्या युवकाला याबद्दल विचारले असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या वकील महिलेने रायपूरच्या पोलीस अधीक्षकांना भ्रमणध्वनीवरून याबद्दल कळवले. त्यांनी राजनांदगाव पोलिसांना सूचना दिली. त्यांनी रेल्वेस्थानकावर पोहचून मुलांना ताब्यात घेतले. युवकाच्या चौकशीतून आणखी काही शयनयान डब्यात मुले असल्याचे समजले. अशा एकूण ३३ मुलांना राजनांदगाव येथे उतरवण्यात आले.   मुलांना चाईल्ड लाईनच्या सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, नागपूर येथील तिकीट तपासनीस रितेश इनुमुला हे या शयनयान डब्यामध्ये होते. ते बिलासपूर येथून या बोगीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी तिकीट तपासणी केली असता आठ जणाचे तिकीट होते आणि त्यांच्यासोबत प्रत्येक दोन अल्पवयीन मुले होती. त्यांच्यासोबत असलेल्या युवकाला त्यांनी विचारले. त्याने शिक्षक असल्याचे सांगितले आणि हावडय़ाहून या मुलांना नंदूरबार येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु त्याने कोणत्या शाळेत घेऊन जात आहे याचा पुरावा दिला नाही. तसेच शिक्षक असल्याचे   ओळखपत्र देखील दाखवले नाही. या तिकीट तपासनीसाने आपल्या वरिष्ठांना कळवले. दरम्यान रायपूर येथून महिला वकील सर्वसाधारण तिकीट घेऊन या बोगीत चढल्या आणि रायपूरच्या पोलीस अधीक्षकाला फोन लावला, असे सूत्रानी सांगितले. प्रथमदर्शनी हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-28


Related Photos