महत्वाच्या बातम्या

 भगवानपूरचे आदर्श पुनर्वसन करणार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भगवानपूर या नावातच देवाचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथील लोकांना उत्कृष्ट दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा देणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. या गोष्टीची सर्व संबंधित अधिका-यांनी जाणीव ठेवावी. गावात शबरी आदिवासी योजनेतून १०० टक्के घर, शेतीला कुंपण, पिण्याचे शुध्द पाणी, रस्ते, नाल्या अशा अनेक बाबींमध्ये भगवानपूरचे आदर्श पुनर्वसन करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे भगवानपूर (ता.मूल) येथील शबरी आदिवासी घरकुल योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, राहुल पावडे, संध्या गुरुनुले, भगवानपूरचे सरपंच सचिन गरमडे आदी उपस्थित होते.

भगवानपूर येथील नागरिकांना शबरी आदिवासी घरकुल योजनेतून घर देण्यासाठी अतिशय सुक्ष्म नियोजन करून प्रस्ताव पाठवा, असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, प्रस्तावासोबत विस्तृत टिपण, लाभार्थ्याचा घरासमोरील फोटो, आवश्यक असल्यास क्यूआर कोड आदी बाबींचा उल्लेख करावा. विशेष बाब म्हणून भगवानपूर येथील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यायचा आहे, त्यामुळे प्रस्ताव परिपूर्ण असायला हवा. घरकुल योजनेसाठी लागणा-या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच ज्या लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र नाही, अशा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीसुध्दा शिबिरांचे आयोजन करावे.

अधिका-यांनी करावी पाहणी : पुनर्वसित असलेल्या भगवानपूरमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, रस्ते नाल्यांची व्यवस्था पाहणीसाठी जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासंदर्भात वन विभागाने पुढाकार घ्यावा, अशा सुचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

पाणंद रस्त्यांचा आढावा : शेतक-यांना शेतापर्यंत ये-जा करण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करणे, तसेच त्यांच्या शेतावर कृषी बी-बियाणे, अवजारे व शेतातील इतर साहित्य वाहून नेण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत ५००० कि.मी. चे रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच आढावा घेतला.

यावेळी बोलतांना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, शेतक-यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते हा अतिशय महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे केवळ उद्दिष्टपुर्ती म्हणून नव्हे तर अभियान म्हणून या विषयाकडे  लक्ष द्यावे. याबाबत जिल्हा परिषदेने विस्तृत नियोजन करावे. नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांची परिषद घ्यावी. तसेच संबंधित कर्मचा-यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. पाणंद रस्त्याच्या योग्य अंमलबजावणीकरीता आवश्यकता असल्यास नवीन कर्मचा-यांची नियुक्ती करावी. पंचायत समिती स्तरावर यासाठी समिती नेमून तक्रारींचे समाधान करण्यासाठी पोर्टल तयार करावे. यात रस्त्याची गुणवत्ता, लागणा-या साहित्याचा दर्जा अशाप्रकारच्या तक्रारी नोंदविता नागरिकांना नोंदविता आल्या पाहिजे.

पाणंद रस्ता करतांना त्यासाठी किती निधीची तरतूद केली, किती कि.मी.चा रस्ता, कधी पूर्ण होणार, कंत्राटदार कोण आहे, यासंबंधिचा फलक लावावा. तसेच अतिक्रमण असलेल्या रस्त्याची मोजणीची व्यवस्था संबंधित विभागाने त्वरीत करावी. पहिल्या टप्प्यात ५००० कि.मी. रस्त्याचे किमान खडीकरण व्हावे, अशी अपेक्षासुध्दा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वेगवेगळ्या स्त्रोतांमधून निधी उभारणार : जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी किमान २०० ते २५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून २५:१५ मधून, मनरेगा, रोहयो, मानवविकास, आदिवासी विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती, खनीज विकास निधी आदी स्त्रोतांमधून निधी उभारणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos