महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
बांधकाम विकासकांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला होता.  यामुळे विरोधक आक्रमक झाले.  आज गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
 पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन ३४२ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसऱ्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे ते म्हणाले. जयंत पाटील यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेदरम्यान उपस्थितही केला होता. याशिवाय याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे पडसाद आज सभागृहातही पहायला मिळाले. पाटील यांनी यासंदर्भात आपले निवेदन सभागृहासमोर सादर केले. त्यांच्या निवेदनानंतर विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, यावेळी विरोधकांनी त्यांना नियमांच्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आपण केलेले वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात आले होते. असे असताना चंद्रकांत पाटील हे सभागृहात निवेदन कसे करू शकतात, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.  यावेळी झालेल्या गोंधळामुळे   सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनीदेखील यावर स्पष्टीकरण देत आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले होते.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-27


Related Photos