महत्वाच्या बातम्या

 जेष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी समाजाने पुढे यावे : खा.रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे यासाठी समाजाने पुढे येवून जबाबदारी स्विकारावी, असे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले.

 जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व आधारवड जेष्ठ नागरिक परिवार संस्थेच्यावतीने जेष्ठ नागरिकाच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.डॉ.पंकज भोयर, जेष्ठ समाज सेवक मोहनबाबू अग्रवाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.

जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राकरीता वर्धेमध्ये जागा उपलब्ध झाली असून त्यावर पुढील वर्षात विरंगुळा केंद्र  तयार करण्यात येईल, असे पुढे बोलतांना खा.रामदास तडस म्हणाले. यावेळी आ.डॉ.पंकज भोयर यांनी आधारवड जेष्ठ नागरिक परिवार सातत्याने जेष्ठांच्या कल्याणासाठी कार्य करत असून त्यांचे हे कार्य अभिनंदनास पात्र आहे, असे सांगितले. शासनाच्यावतीने जेष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी समाज कल्याण कार्यालयामार्फत चांगल्या प्रकारे पार पाडण्यात येत असल्याबाबत सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी ज्यांनी आयुष्याची ७५ वर्षे पुर्ण केली अशा १७ जेष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच १४ गरजू जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर दंडारे यांनी केले. संचालन आधारवडच्या जेष्ठ नागरिक कल्पना लांडगे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos