काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव समजणे हा केवळ अहंकार : पंतप्रधान नरेंद्र मोदी


- ईव्हीएम काँग्रेसनेच आणले 
वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :
  वायनाडमध्ये भारत हारला का? रायबरेली, बहरामपूर आणि तिरुवनंतपूरममध्ये भारत हारला काय?, अशी प्रश्नांची सरबत्ती करतानाच काँग्रेस पक्ष हरला म्हणजे देश हरला काय?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. ईव्हीएम मशीनमुळेच लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या विरोधकांच्या टीकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत   समाचार घेतला. 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सवाल केला. काँग्रेसचा  पराभव म्हणजे देशाचा पराभव समजणे हा केवळ अहंकार आहे. असं मोदी म्हणाले. 
लोकसभा निवडणुकीच्या काळात तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे होते. तरीही लोक रांगेत उभे होते. ८० वर्षाचे ज्येष्ठ नागरिकही रांगेत उभे होते आणि आपण निवडणुकांवर आक्षेप घेऊन त्यांचा अपमान करत आहोत, असं सांगतानाच यंदा प्रथमच पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मतदानात भाग घेतल्याचंही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.
 १९७७ मध्ये ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली. १९८२ मध्ये त्याचा पहिल्यांदा प्रयोग झाला. १९८८ मध्ये ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यास या सभागृहातील सदस्यांनी कायदेशीर मान्यता दिली. काँग्रेसच्या नेतृत्वातच नियम बनविण्यात आले. आता तुम्ही पराभूत झालात म्हणूनच गळा काढत आहात. हा काय प्रकार आहे, असा सवाल करतानाच याच ईव्हीएमद्वारे विधानसभेच्या ११३ आणि लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या. सदस्यांना सभागृहात येण्याची संधी मिळाली. सर्व परीक्षणानंतर न्यायालयाने ईव्हीएम मशीन योग्यच असल्याचा निर्वाळा दिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.    Print


News - World | Posted : 2019-06-26


Related Photos