महत्वाच्या बातम्या

 यूट्यूबवर लाइक व स्क्रीनशाॅटचा फंडा : व्यवस्थापकाला ७७ लाखांचा गंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : यूट्युबवरील व्हिडीओला लाइक करून स्क्रीनशॉट पाठविल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने वेकोलीच्या व्यवस्थापकाची ७७ लाख रुपयांनी फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित वेकोलिच्या व्यवस्थापकाने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सरीकोंडा त्रिनाध कोटम राजू (५६, संदेश सिटी, जामठा) हे वेकोलीमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे टेलीग्रामवर अकाउंट आहे. सायबर गुन्हेगाराने त्यांना टेलीग्रामवर एक लिंक पाठविली. त्यांना यूट्युबवरील व्हिडीओला लाइक करून स्क्रीनशॉट पाठविल्यास प्रत्येक व्हिडीओला ५० रुपये देण्याचे आमिष दाखवले. घरबसल्या पैसे मिळणार असल्यामुळे सरीकोंडा यांनी ५० व्हिडीओ लाइक करून त्याचे स्क्रीनशॉट पाठविले. आरोपीने त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने पुन्हा त्यांना नवीन लिंक पाठवून अर्ज भरण्यास सांगितले. त्यात बँकेच्या माहितीचा समावेश होता.

सरीकोंडा यांनी आपला पासवर्ड आणि बँक खात्याची माहिती त्यात भरली. त्यानंतर २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान सायबर गुन्हेगाराने सरीकोंडा यांच्या खात्यातून ७७ लाख ४ हजार ८२४ रुपये दुसऱ्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सरीकोंडा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध कलम ४२०, ३४, सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस तपास करीत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos