काम सुरू करा, संधी चालून येतील: नीलिमा मिश्रा


-  निर्माण शिबिरात उलगडला सामाजिक प्रवास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
प्रत्येकच व्यक्तीमध्ये सहवेदना असतात. दुसऱ्याला होणारा त्रास पाहून हे थांबायला हवे असे वाटत असते. पण त्यासाठीचे प्रयत्न, धडपड सर्वांच्याच हातून घडतात असे नाही. कारण समाजासाठी कार्य करण्याचा प्रत्येकाचा मार्ग पैलू वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा मार्ग शोधावाच लागेल. आणि तो सापडला की काम सुरू करा, संधी आपोआप चालून येतील, असा अनुभव विचार रेमन मैगसेसे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नीलिमा मिश्रा यांनी निर्माणच्या युवांना दिला.
सर्च(शोधग्राम) येथे निर्माणच्या नवव्या बॅचच्या दुसऱ्या शिबिरात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेच्या माध्यमातून खान्देश परिसरात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या नीलिमा मिश्रा यांनी स्वतःच्या कार्याचा प्रवास उलगडला. आपल्याला नक्की कुणासाठी आणि काय करायचं आहे हे निश्चित करून अनुभव घेत कसे मार्ग सापडत गेले हे त्यांनी या संवादात सांगितले. सतत उपाशी राहत असलेले माझे गाव, लोकांची गरिबी, शेतकरी भावांच्या अडचणी आणि यासाठी आपण काहीही करू शकत नाही ही गावातल्या महिलांच्या मनातली सल बालपणापासूनच त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यामुळे आपल्या गावासाठी, इथल्या लोकांसाठी काही तरी करायचं आहे हे ठरत असतानाच काय नाही करायचे हे देखील निश्चित होत गेले. कामाची काही मुल्य ठरविली. कामाची संवेदनशीलता हरवू नये यासाठी शासनाचा पैसा घायचा नाही हे निश्चित केले. लोकांनी काय करायचे हे न सांगता तुम्हाला काय करायचे आहे हे त्यांच्याकडूनच ऐकायचे हे देखील निश्चित झाले. चार मोठी पुस्तकं वाचून आपण समाजाला ज्ञान देऊ शकतो हा गैरसमज आहे. हा समाज हुशार आहे. या समाजाला प्रश्न आणि त्याची उत्तरे आधीच माहिती आहे. पण समाज आपले प्रश्न सोडायला तयार नाही. अशा प्रश्नांची उत्तरे समाजाकडूनच मिळावी यासाठी समाजाचे ऐकायचे हे ठरवून केलेल्या कामांचे अनुभव त्यांनी यावेळी मांडले.  
आपल्या मर्यादा आणि क्षमता तपासणे आवश्यक असल्याचे सांगताना मिश्रा म्हणाल्या, आपण खूप काही करू शकतो असे प्रत्येकालाच वाटते. ते चुकही नाही. पण आपल्या मर्यादा आणि क्षमता तपासल्या तर वास्तवाची जाण लवकर येऊन वेळ वाचतो. क्षमता विकसित करून धेय्य गाठण्याकडे यामुळे वाटचाल करता येते. कोणतेही काम करताना पैसा उभा करणे खूप मोठी अडचण ठरते. त्यामुळे सातत्यपूर्ण कामावर भर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.  
अर्थव्यवस्थेचा अभाव गरीबीचे मोठे कारण होते. त्यामुळे महिलांना संघटीत करून त्यांच्याच पुढाकाराने नीलिमा मिश्रा यांनी लहान लहान उद्योग सुरू केले. त्याची सूत्रेही महिलांच्याच हाती दिली. यातून महिला स्वतः आर्थिक व्यवहार शिकत गेल्या. ज्यामुळे आज महिलांचे मोठेमोठे समूह न घाबरता व्यवसाय करीत आहेत. याच महिलांनी तयार केलेली गोधडी आज आंतरराष्ट्रीय ब्रांड बनली आहे.
समस्या शोधून त्यावर उपाय शोधणे हे कामाचे स्वरूप असणे गरजेचे आहे. गावाच्या समस्या गावालाच माहिती असतात. त्यामुळे उत्तरेही त्यांनाच शोधू द्या असेही त्या म्हणाल्या. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजही आम्ही शिकतच आहो. अनुभव माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवतो. त्यामुळे अनुभव घ्यावेच लागतील. लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा हे त्यांना बोलून नाही तर कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे. अडचणींना घाबरू नका, या अडचणीच आपल्याला बनवीत असल्याचा मूलमंत्र त्यांनी या संवादातून युवांना दिला.  


डोकं रिकामं ठेवा

अर्धवट ज्ञान माणसाचे नुकसान करते. त्यामुळे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी डोकं रिकामं ठेवा. तेव्हाच त्या गोष्टीतील बारकावे समजून घेता येईल. अनेकदा आपले शिक्षण वेड्यासारखे प्रश्न विचारण्यावर मर्यादा आणते. पुढचा माणूस तुमच्या शिक्षणाने तुमचे मूल्यमापन करीत असतो. हे मुल्यांकन टाळण्यासाठी शिक्षण बाजूला ठेवून वेड्यासारखे प्रश्न विचारता आले पहिले. अशा वेड्या प्रश्नातून आपण घडत जातो.


ज्याची अडचण आहे त्यालाच उपाय विचारा

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यावर मार्ग शोधण्याचा अनुभव सांगताना नीलिमा मिश्रा म्हणाल्या, शेतकऱ्यांना ज्ञान देण्यासाठी सगळेच तत्पर आहे, पण मला वाचविण्यासाठी शेतकरी सांगत असलेले उपाय कुणालाच ऐकायचे नाही. समस्या त्याची आणि उपाय दुसऱ्याचे असा विचित्र तिढा होऊन बसला आहे. आज उत्पन्न घेण्यासाठी त्याला शंभर रुपयाची गरज आहे. पण ते द्यायला कुणी तयार नाही. उद्या वेळ निघून गेल्यावर दिलेले हजार रुपयेही त्याच्या कामाचे नाही. त्यामुळे त्याची गरज त्यालाच विचारून आम्ही आर्थिक मदत केली. अनेकांनी आम्हाला मुर्खात काढले. पण त्याच शेतकऱ्यांनी सर्व पैसा परत करून आम्हाला शहाणे सिद्ध केले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos