आरमोरीतील रामसागर तलाव घाणीच्या विळख्यात


- तलावाची स्वच्छता करण्याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
शहराच्या मध्यभागी असलेल्या व आरमोरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेले रामसागर तलाव घाणीच्या विळख्यात सापडले असून मोठ्या प्रमाणात प्लाॅस्टीक तसेच इतर कचरा साचून आहे.
रामसागर तलावात वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी असते. परंतु घाणीमुळे या पाण्यात डुकरांचा वावर असतो. तसेच शहरातील काही भागातील घाण पाणीसुध्दा या तलावामध्ये मिसळते. यामुळे पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. यामुळे तलावालगतच्या नागरीकांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
आरमोरी शहर हे धार्मिक ऐक्य जोपासणारे शहर आहे. या शहरातील दुर्गा उत्सव संपूर्ण राज्यात सुपरिचित आहे. शारदा, दुर्गा तसेच गणेश मूर्तींचे विसर्जनसुध्दा याच तलावात केले जाते. रामसागर तलाव एक जागृत दुर्गामातेच्या मंदिराला लागून आहे. मात्र प्रचंड घाणीमुळे हा तलाव रामसागर आहे की घाणसागर आहे, हेच कळायला मार्ग नाही. काडी कचरा गोळा करून तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. 
याबाबत आरमोरी नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती भारत बावनथडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ग्रामपंचायत असताना शहरातील सर्व सांडपाणी या तलावात जात होते. या काळात तलावाची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे  तलावात आजही घाणीचे साम्राज्य आहे. नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषदेसमोर रामसागर तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. आम्ही रामसागर तलावाचे डी.पी.आर. मंजूर करण्याचा प्रास्ताव पाठविला आहे. लवकरच तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल, अशी माहिती बावनथडे यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-25


Related Photos