कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या शिफा ला नवऱ्यासह अटक


- ५ कोटीच्या वर रक्कम घेऊन लोकांची केली होती फसवणूक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : सर्वसामान्यांना कोट्यवधींनी गंडविणारी शिफा उर्फ शबाना शेख व तिचा पती राजू चौधरी या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सर्वसामान्यांना विविध आमिष दाखवून शिफा नामक महिलेने शहरात कोट्यवधींचा घोटाळा केला होता. या महिलेचे दररोज नवनविन किस्से समोर येत होते. १० हजारात एक तोळा सोना, २० हजारात दुचाकी, अडिच लाखात चारचाकी तसेच ७० हजारात घरकुल बांधकाम एवढेच नाही तर नोकरी लाउन देण्याची हमी सुध्दा या महिलेने घेतली होती. याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये महिला पसार झाल्याची बातमी छापून येताच गुंतवणूकदारांची पाया खालची रेती बाजूला सारली गेली. गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. व त्यानंतर वरिष्ठांकडे या बाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४२० , ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला व शिफा प्रकरणात शोध सुरू केला.
काही दिवसांआधी देसाईगंज पोलीसांची एक चमू गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश कडे रवाना झाली. या चमुला शिफा उर्फ शबाना शेख व तिचा पती राजू चौधरी यांना अटक करण्यात यश मिळाले व काल २४ जून रोजी शिफा ला अटक करण्यात आली.यात प्राथमिक माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश राज्यातून शिफा ला घेऊन पोलीस निघाल्याची माहिती मिळाली व आज देसाईगंज पोलीस स्टेशन येथे शिफा ला आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक देसाईगंज यांना काही महत्वाची कागदपत्रे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली व शिफा प्रकरणात आता कोण कोण बड्या घरच्या व्यक्तींचे नावे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
News - Gadchiroli | Posted : 2019-06-25