बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी एका महिन्यात वटहुकूम काढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


वृत्तसंस्था / मुंबई  :  मराठी भाषेचा अडकलेला अभिजात दर्जा, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, शालेय पातळीवर मराठीचा अभ्यास न करण्याची मिळणारी सवलत या पार्श्वभूमीवर 'मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या २४ संस्थांनी सोमवारी आझाद मैदानात आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक शिष्टमंडळाची भेट घेऊन, मराठी शिक्षण कायद्यासंदर्भात बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढण्याचे आश्वासन दिले. 
विधानसभा निवडणुकांआधीचे हे अखेरचे अधिवेशन असल्याने इतकी वर्षे मराठीसाठी स्वतंत्रपणे लढणाऱ्या २४ संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतला. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठीप्रेमी एकत्र आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली. ग्रामीण आणि सीमावर्ती भागात मराठी शाळांसंदर्भातील समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या सरकारपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षकांनी सांगितले. तर 'महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आंदोलनाची पाळी येणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे', अशी प्रतिक्रिया डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रा. हरी नरके यांनी दिली. 
दुपारी अडीचनंतर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर प्रामुख्याने सहा मागण्यात ठेवण्यात आल्या. त्यातील दोन मागण्यांवर दीर्घ चर्चा झाली. 'या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने शिष्टाई यशस्वी झाली', अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाचे कार्याध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढण्याचा शब्द दिला आहे. या विषयावर सरकार अनुकूल आहे. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी शासननिर्णय काढण्याचा तसेच बृहतआराखड्याबाबत चर्चा करण्याचे अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे', असे देशमुख म्हणाले.  
आझाद मैदानात उपस्थित आंदोलकांना संबोधन करताना देशमुख यांनी, या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सहा महिन्यांनी पुन्हा एकदा मोर्चाची तयारी ठेवा, असेही आवाहन केले. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि समितीचे मानद अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले, समिती कार्यवाह चंद्रशेखर गोखले, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुण्याचे पदाधिकारी मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार, साहित्य महामंडळ कार्यवाह डॉ. दादा गोरे, मुख्याध्यापक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शंकर पवार, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे प्रतिनिधी सुनील डिसले, मराठा एकीकरण समितीचे प्रमोद मसुरकर आदींचा समावेश होता.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-25


Related Photos