महत्वाच्या बातम्या

 जिल्हयात २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ दरम्यान संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान ही मोहिम आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर यांनी आज या मोहीमेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. सन २०२७ पर्यत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचालीसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.प्रत्येक पथक दररोज २५ ते २० घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत होईल अशा प्रकारे पथके तयार केली आहेत.

प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरूष कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महीला कर्मचाऱ्यांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरीता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी‍ त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे, इ. लक्षणे विचारुन तपासणी होणार आहे.

तर क्षयरोगासाठी दोन आठवडयापेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ या लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैदयकिय अधिकारी यांचेकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे. तर क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास एक तासाच्या अंतराने दोन थुंकी नमुने घेऊन X Ray करीता संदर्भित करुन तपासणी अंती निदान निश्चित करण्यात येणार आहे.

या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहूविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहूविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे, क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाद्वारे शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे हे उद्दीष्ठ साध्य करण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वत:ची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन तसेच क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास आवश्यक तपासणी करुन उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos