ओएलएक्सलवर २०० रुपयांना बॅग विकण्याच्या प्रयत्नात 'तिला' बसला २८ हजारांचा फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
वापरात नसलेली बॅग दोनशे रुपयांत विक्रीसाठी ओएलएक्सलवर जाहिरात टाकलेल्या एका विद्यार्थिनीला  दोनशे रुपये खात्यात मिळण्याऐवजी  तिच्या  मैत्रिणीच्या खात्यातून  केवळ चारच मिनिटांत २८ हजार ५१५ लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
अनेक दिवसांपासून स्वत:जवळ पडून असलेली बॅग विक्री करण्यासाठी आपल्या बहिणीच्या मोबाइलवरून विद्यार्थिनीने शुक्रवारी दुपारी फोटोसह जाहिरात अपलोड केली. त्यानंतर काही तासांतच ओएलएक्सवरून एकाने ही बॅग खरेदीची इच्छा दर्शवीत सहकाऱ्याला पाठवत असल्याचे विद्यार्थिनीला सांगितले. मात्र, 'दोनशे रुपये पेटीएमद्वारे अथवा तुमच्या सहकाऱ्यासोबत रोखीने पाठवा, नंतरच बॅग मिळेल', असे विद्यार्थिनीने सांगितले. यावर, 'मी लगेच पैसे पाठवतो', असे समोरच्याने सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पैसे मिळाले नव्हते. यानंतर शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीला पुन्हा त्या खरेदीदाराचा फोन आला. 'तुमच्या पेटीएमवर पैसे वळते होत नसल्याने मी 'गूगल पे'द्वारे पैसे पाठवतो, तुम्ही नंबर द्या', असे त्याने सांगितले. या विद्यार्थिनीकडे गूगल पे नसल्याने तिच्या मैत्रिणीने 'माझ्या खात्यात पैसे मागवून घे' म्हणत स्वत:च्या खात्याचे डिटेल्स खरेदीदाराला पाठविण्यास सांगितले. नंतर या विद्यार्थिनीने मैत्रिणीचा गूगल पे भ्रमणध्वनी क्रमांक आणि क्यूआर कोड शेअर केला. मात्र, खरेदीदाराने कॉल सुरू असतानाच विविध तीन ट्रान्झेक्शनद्वारे २८ हजार ५१५ रुपये या मैत्रिणीच्या खात्यातून 'मनीषा प्रकाश मोरे' नावाच्या खात्यात वळवून घेतले. कॉल कट होताच खात्यात पैसे जमा झाले नसून कपात झाल्याचे दोन्ही विद्यार्थिनींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्या खरेदीदाराला फोन केला असता 'मला दहा मिनिटे द्या, मी पैसे पाठवतो', असे त्याने सांगितले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दोन्ही विद्यार्थिनींनी दहा मिनिटांत सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले. ठाण्यातून त्या क्रमांकावर फोन केला असता त्या खरेदीदाराचा फोन 'स्विच्ड ऑफ' येत होता. 
 थेट खात्यातून पैशांचे देवाण-घेवाण करण्यासाठी 'गूगल पे'मध्ये 'What's this for?' हा कमेंट बॉक्स 'व्यवहार कशासाठी आहे', ही आठवण ठेवण्यासाठी दिला जातो. यामध्ये 'दोनशे रुपये खात्यात जमा होणार', असा मेसेज लिहून या खरेदीदाराने प्रत्येकी ९५०५ रुपयांचे तीन व्यवहार शनिवारी दुपारी ४.२३, ४.२४ आणि ४.२६ वाजता केले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-24


Related Photos