मान्सूनच्या विदर्भातील आगमनाने मोडला मागील दहा वर्षांचा रेकॉर्ड , शेतकरी चिंतातुर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  विदर्भात मान्सूनचे शनिवारी आगमन झाले. पुढील दोन दिवसांत नागपूर तसेच संपूर्ण विदर्भ मान्सूनने व्यापलेला असेल. मात्र, यंदा मान्सूनच्या आगमनाने गेल्या दहा वर्षांत त्याच्या आगमनाचा रेकॉर्ड मोडला आहे. मागील १० वर्षांत मान्सूनच्या आगमनाला इतका उशीर झालेला नाही, हे विशेष. मान्सून दाखल झाला असला तरी  पुढल्या काही दिवसात  मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज असल्याने  शेतकरी चिंतातुर आहे. 
गेल्या दहा वर्षांत २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला. गुरुवारी राज्यात मान्सून दाखल झाला. त्याच दिवशीपासून नागपूर आणि विदर्भातही पाऊस सुरू झाला. चटके देणाऱ्या उन्हाळ्यापासून कधी मुक्तता होणार, याकडे विदर्भवासी व नागपूरकर चातकासारखे डोळे लावून होते. अखेर शनिवारी मान्सूनचे ब्रह्मपुरीमार्गे विदर्भात प्रवेश केला. केंद्रीय हवामान खात्यानुसार, शनिवारी 'दक्षिण-पश्चिम मान्सून' मध्य प्रदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत दाखल झाला. सहसा मान्सून १ जून रोजी केरळ‌ात धडकतो, त्यानंतर तो पुढे सरकतो. मात्र, यंदा मान्सून मुळातच उशिरा आला. तो ८ जून रोजी केर‌ळात दाखल झाला. त्यानंतर 'वायू' या चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. गेल्या आठवड्याभरात या वाऱ्यांचा वेग वाढला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि शनिवारी मान्सून विदर्भात दाखल झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सध्या कायम असून तो मान्सून वाऱ्यांच्या गतीसाठी पोषक असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-24


Related Photos