रामकथा सुरू असलेला मंडप कोसळला : १४ भाविकांचा मृत्यू, २४ गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बाडमेर :
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बालोतरा येथे रविवारी सायंकाळी वादळी वारे आणि पावसामुळे रामकथेसाठी आयोजित मंडप कोसळला. या दुर्घटनेमध्ये १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बालोतरा येथे एका वस्तीवर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमाराच आलेले वादळी वारे आणि पावसापुढे हा मंडप तग धरू शकला नाही आणि भाविकांवर कोसळला. या दुर्घटनेत १४ भाविकांचा जागीच मृत्यू, तर २४ गंभीर जखमी झाले. कथा सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. गंभीर जखमींना खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहेत. तसेच सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफला तात्काळ रुग्णालयात दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

   Print


News - World | Posted : 2019-06-23


Related Photos