दोन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार , पुणे वेधशाळेचा अंदाज


वृत्तसंस्था / पुणे :  येत्या दोन दिवसांत मान्सून  संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचे संकेत  पुणे वेधशाळे दिले आहेत. दरम्यान,  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सध्या वेगात सुरू असून, शनिवारी त्यांनी मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागांबरोबरच मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागातही प्रवेश केला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आदी भागांत पाऊस बरसला. मोसमी वारे दोन ते तीन दिवसांमध्ये राज्य व्यापणार आहे. कोकण विभागासह उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी वारे यंदा तब्बल दोन आठवडय़ांच्या विलंबाने राज्यात दाखल झाला आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळला आहे. मात्र, त्याचे प्रमाण यंदा कमी होते. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला नाही. पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे मोसमी पावसाकडे सर्वाचेच डोळे लागले आहेत. पूर्वमोसमी पाऊस न झालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना हलका दिलासा मिळाला आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-23


Related Photos