रोमहर्षक लढतीत भारताने अफगाणिस्तानवर मिळविला ११ धावांनी निसटता विजय, जसप्रीत बुमराह सामनावीर


वृत्तसंस्था / साउदम्प्टन :  शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी निसटता विजय मिळवत वर्ल्डकपमधील विजयी घोडदौड कायम राखली आहे. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतलेली हॅट्ट्रिक निर्णायक ठरली. १० षटकांत ३९ धावांच्या बदल्यात दोन बळी टिपणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. 
भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या मोबदल्यात २२४ धावा करून २२५ धावांचे माफक आव्हान अफगाणिस्तानपुढे ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद नबीचं अर्धशतक व रहमत शहाच्या ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने अखेरपर्यंत झुंज दिली. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्यांच्या हातात तीन गडी होते. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नबीने चौकार मारत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. सामना कोणत्याही बाजूला झुकेल असे चिन्ह होते. मात्र नंतर धोनीने शमीला कानमंत्र दिला आणि चित्रच पालटले. दुसरा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर नबी मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्यापुढच्या दोन्ही चेंडूंवर लागोपाठ बळी टिपत शमीने आपली हॅट्ट्रिक आणि भारताचा विजयही साकारला. यंदाच्या वर्ल्डकपमधील हा सर्वात रोमहर्षक सामना ठरला.    Print


News - World | Posted : 2019-06-23


Related Photos