महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभागाला मिळणार १५० ई-बस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात दोन हजार ईलेक्ट्रिक बस (ई-बस) चा देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. यात वाढ होऊन ती संख्या पाच हजारापर्यंत जाणार आहे. यातील १५० ई-बस नागपूर विभागाला मिळण्याचे संकेत आहेत. मार्चपर्यंत ही वाहने एसटीच्या ताफ्यात आणण्यासाठी महामंडळ आग्रही असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने २ हजार ई-बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. एसटीने एक जूनला परिवहन दिनानिमित्त ‘शिवाई’ ही विजेवरील बस सुरू केली. त्याशिवाय हा २ हजार ई-बसचा प्रस्ताव आहे. यानंतर बससंख्या पुढे ५ हजारापर्यंत वाढवणार आहे. हा नवीन प्रकल्प असून बस पुरवठादार कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे. निविदा प्रक्रिया आणि इतर आवश्यक बाबी अंतिम टप्प्यात आहेत. ही सर्व वाहने वर्ष २०२३ पूर्वी दाखल होतील.

मात्र, महामंडळ आग्रही असल्याने ही वाहने मार्चमध्येच नागपूरच्या रस्त्यावर धावताना दिसतील. नागपूर विभागात आठ आगार आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांकावरील गणेशपेठ नंतर घाटरोड व इमामवाडा हे आगार मोठे आहेत. १५० ई-बसमधून या तीन आगारांना अधिक वाहने मिळू शकतात.

शहर बससारखे एसटीचे संचालन नाही. लांब पल्ल्याच्या मार्गावर गाड्या धावतात. बॅटरीवरील या ई-बसच्या चार्जिंग स्टेशनचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या मार्गावर आणि कुठे चार्जिंग पॉईंट द्यायचे याची चाचपणी महामंडळाकडून सुरू आहे. त्याचबरोबर आगारात ही सुविधा राहणार आहे.


ई-बसची वैशिष्ट्ये

- २ हजारपैकी १ हजार ५० गाड्या १२ मीटर लांबीच्या

- उर्वरित ९५० वाहने साडेनऊ मीटर लांबीची

- अत्याधुनिकतेमुळे त्वरित बॅटरी चार्ज होणार

- २ हजार वाहनावरील डिझेल खर्च कमी

- वायूसोबतच ध्वनी प्रदूषणमुक्त प्रवास

- इलेक्ट्रॉनिक गंतव्यदर्शक फलक

- सर्व्हिलन्स कॅमेरा, मोबाईल चार्जिंग सुविधा

- उत्तम आसन व्यवस्था, वातानुकूलित प्रवास

- प्रत्येक आसनासाठी एक आपत्कालीन बटण

- ग्रामीणच्या प्रवाशांना आकर्षित करणार






  Print






News - Nagpur




Related Photos