महत्वाच्या बातम्या

 भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने या भागातील जनतेस होणारा त्रास आता बंद होणार आहे. आलापल्ली- भामरागड-लाहेरी-गुंडेनूर- बिनागुंडा-कुवाकोडी ते राज्य सीमा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वरील गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु झालेले आहे. यात ८ पायव्याचे काम पूर्ण झालेले असुन उर्वरित ६ पायव्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत गुंडेनूर नाल्यावर १४० मीटर्स लांबीचे २  पूल व १ हजार ६४४ मीटर्स लांबीचा जोडरस्ता समाविष्ट असुन सदरील प्रकल्प मे २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली, विवेक मिश्रा यांनी दिली.

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून भौगोलिक दृष्टया अडचणीचा आहे. पूर्वेकडील तालुके वनव्याप्त असून भामरागड, टिपागड, पाळसगड व सुरजागड हा भाग डोंगराळ आहे. तसेच जिल्हयात गोदावरी, वैनगंगा, प्राणहिता, पर्लकोटा इंद्रावती इत्यादी प्रमुख नद्या असुन बऱ्याच उपनद्या व नाले आहेत. अशा भौगोलिक परिस्थितीत येथील लोकसंख्या विखुरलेली आहे. 

विशेषत : पावसाळयात दळणवळणाची समस्या उद्धवते. सदर जिल्हयाच्या विकासाकडे शासनाचे विशेष लक्ष असुन जीर्ण रस्ते व पूल यांची दुरुस्ती करणे व नवीन रस्ते व पूल बांधणे याबाबत शासन सजग आहे. रस्त्यांच्या व नद्या/नाल्यांच्या अडचणीमुळे येथील जनतेस होणारा त्रास दूर करणे, क्वचित प्रसंगी होणारे मृत्यू टाळणे, याबाबत शासन कटीबद्ध असल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली. रस्त्यांचे व पूलांचे बांधकाम शीघ्र गतीने पूर्ण करण्याकरीता जिल्हा प्रशासन तत्पर असून प्रकल्प राबवितांना येणारे विविध स्तरावरील अडथळे संबंधित विभागांकडून दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्या जातात. जनतेस नाहक त्रास होऊ नये व विनाकारण जिवित हानी होऊ नये, याबाबत शासन व प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos