महत्वाच्या बातम्या

 उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे सीईओची आकस्मिक भेट


- अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शहरातील आरोग्य यंत्रणेला उर्जीत केल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत आता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा तपासणे सुरु झाले आहे.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयात आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची तपासणी व औषध साठ्याची खातरजमा केली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात १३ तालुका आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र असा प्रचंड मोठा ताफा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची काळजी घेताना या यंत्रणेला येणाऱ्या अडचणी यावेळी श्रीमती शर्मा यांनी जाणून घेतल्या.
उप जिल्हा रुग्णालयात पाहणी करतांना जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. औषधाच्या साठ्याची तपासणी करता स्टॉक रजिस्टर बरोबर आढळले.
रुग्णालयाची स्वच्छता व रुग्णांच्या सोई-सुविधेबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छता निरीक्षकांनी तत्काळ दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रामीण भागातील रुग्णालयातील औषध साठ्यांबाबत निश्चित असावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांबाबत विश्वास ठेवावा. सर्वत्र मुबलक औषधसाठा असून ग्रामीण रुगणालये अद्ययावत आहेत. नागरिकांनी आरोग्य सुविधा घेण्यासाठी खात्रीलायक इलाज म्हणून शासकीय वैद्यकीय यंत्रणेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुषंगाने नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य विभागाच्या दोन बैठकी घेऊन अधिकाऱ्यांना आदेशित केले. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करुन आरोग्य  यंत्रणेची माहिती माध्यमांना दिली.  ग्रामीण भागात सुध्दा नुकतेच कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची तपासणी केली.





  Print






News - Nagpur




Related Photos