समाजातील प्रश्नांना भिडण्यासाठी तरुणाई सज्ज


- शनिवारपासून निर्माण ९.२ सत्राचे पहिले शिबीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी /  गडचिरोली
: समाजाला भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह इतरही प्रश्नांना चर्चा आणि संवादातून समजून घेत त्यांना थेट भिडण्यासाठी राज्यभरातील ५५ निर्माणी युवा सज्ज झाले आहेत. २२ जून पासून निर्माणच्या ९.२ सत्राचे पहिले शिबीर सर्च(शोधग्राम) येथे आयोजित करण्यात आले आहे.
जास्त पैसा मिळवून देणारे बाजारी शिक्षण, बड्या पगाराची सुरक्षित नोकरी, सावलीतला संसार, सुखासुखी पेन्शन, आत्मसंतुष्ट किंवा असंतुष्ट मरण असेच का म्हणून जगावे? त्या पेक्षा आयुष्यात काही ‘वेगळे’ करावेसे वाटते, पण काय करायचे? ही वाट कुठे सापडेल ? आयुष्यात ‘सेटल’ होण्याची माझी व्याख्या काय? समाजातली आव्हाने आणि प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या शिक्षणाचा, कौशल्यांचा उपयोग कसा करता येईल यासारखे जगण्याविषयीचे  प्रश्न पडलेल्या तरुणाईसाठीचा उपक्रम म्हणजे ‘निर्माण’. २२ ते ३० जून दरम्यान होणाऱ्या  निर्माणच्या ९.२ सत्रातील पहिल्या शिबिरात ‘वेगळे’ आयुष्य जगण्यासाठी आणि समाजातील प्रश्नांना भिडण्यासाठी ५५ युवांचा जागर रंगणार आहे. माझ्यासभोवतालच्या समाजाची व निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न व त्या सोडवण्याच्या वेगवेगळया पद्धती, प्रत्यक्ष सामाजिक काम करणाऱ्या विविध लोकांसोबत संवाद, भारतातील प्रश्नांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाजू काय असे टप्पे समजून घेत ‘मी जीवनात आता काय करू’ या निर्णयापर्यंत शिबिरार्थीला पोहोचविणे हा या शिबिराचा उद्देश आहे. शिबिरात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन’ संस्थेसोबत काम करणाऱ्या रेमन मैग्सेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा युवांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पालघरमध्ये काम करणाऱ्या “क्वेस्ट” संस्थेचे संचालक शिक्षणतज्ञ निलेश निमकर त्यांचा प्रवास युवांना ऐकायला मिळणार आहेत. ‘अमरावती येथील दिशा फॉर विक्टीम’ संस्थेचे संस्थापक प्रवीण खानापासुरे शिबिरार्थ्यांची चर्चा करणार आहेत. 
२००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी समाजातील आव्हाने आणि अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असलेले युवा यांच्यात दुवा बांधण्यासाठी ‘निर्माण’ हा शैक्षणिक उपक्रम सुरु केला. ‘नयी तालीम’ या कृतीतून शिकण्याच्या शिक्षणपद्धतीवर ‘निर्माण’ची ही शैक्षणिक प्रक्रिया आधारित आहे. युवकांना हेतुपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करीत पाठबळ देणे आणि अशा युवांना संघटीत ठेवणे हे ‘निर्माण’चे उदिष्ट आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos