इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम अंतीम टप्प्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अंकीसा :
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६०  किमी अंतरावर असलेल्या व महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या पातागुडम जवळील इंद्रावती नदीवर निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम अंतीम टप्प्यात आले आहे.
राष्टीय महामार्ग क्रमांक ६३ निजामाबाद ते जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गात आलेल्या प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम दोन महिन्याआधी पूर्ण झाले. छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या पातागुडम या गावाजवळील इंद्रावती नदीवर पुलासाठी सर्व गाळे बसविण्यात आले आहे. केवळ स्लॅब आणि साईड पिचिंग तसेच इतर कामे उरलेली आहेत. यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे कंत्राटदाराने कामाला गती दिली. यामुळे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या नदीतून लोक नावेने प्रवास करतात. मात्र पुलाच्या निर्मितीनंतर नागरीकांचा जिवघेणा प्रवास बंद होणार आहे. तसेच नावेतून प्रवास करताना नागरीकांना १५० ते २०० रूपये मोजावे लागतात. पुलाच्या निर्मितीमुळे आर्थिक बचतसुध्दा होणार आहे.
असरअल्लीपासून पातागुडम, इंद्रावती नदीपर्यंत काम एका खासगी कंपनीमार्फत सुरू आहे. जेमतेम महामार्गाचे व पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. कंत्राटदारांनी अधिक यंत्रणा व मनुष्यबळ वापरून काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos