गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत काही शिक्षक न्यायालयात गेल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये रोष निर्माण झालेला असून,बदलीपात्र शिक्षक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख संघटनांची समन्वय समिती निर्माण करण्यात आलेली असून,  याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.
 महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पाडलेली असून फक्त गडचिरोली जिल्हा परिषदेने बदली प्रक्रिया रखडवलेली आहे.  प्रकरण असे आहे की, मागील वर्षीच्या मे २०१८ च्या बदली प्रक्रियेत काही शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांना दुर्गम भागात जावे लागले. त्यामुळे ६८ शिक्षक न्यायालयात गेले. महत्वाचे म्हणजे या ६८ पैकी अनेक शिक्षकांनी यावर्षीच्या बदली प्रक्रियेत संवर्ग १, २ मध्ये फॉर्म भरलेला आहे. आणि शासनाने पण या विस्थापित शिक्षकांना  २८ मे २०१८  च्या शुद्धीपत्रकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर समुपदेशन करून त्यांना शाळा निवडण्याची संधी दिलेली आहे. परंतु यावरही विस्थापित शिक्षकांचे समाधान न झाल्याने हे शिक्षक न्यायालयात गेलेले आहेत.
  त्यामुळे यावर्षी मे २०१९ च्या बदली प्रक्रियेत फॉर्म भरूनही जिल्ह्यातील जवळपास ४००  ते ५०० दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षक बदलीपासून, पर्यायाने आपल्या कुटुंबापासून वंचित राहण्याचे चिन्ह दिसत आहे.
 यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झालेला असून शिक्षक ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा येत्या २६ जून ला उघडतील की नाही...? अशी भीती निर्माण झालेली आहे.
शासन आता जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी या बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पाडेल काय...? अशी चिंता अनेक बदलीपात्र शिक्षकांना लागून आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos