महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आपली नाळ श्रमाशी जोडून ठेवायला हवे : रवींद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर


- श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगांव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या जाणीव जागृती कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : विद्यार्थ्यांनी नियमित वर्तमानपत्राचे वाचन केले पाहिजे. जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाची गरज असते. हे ज्ञान विविध ग्रंथातून जसे आपणास मिळते तसे वर्तमानपत्रातूनही मिळते. रोजचे वर्तमानपत्र वाचण्यासोबतच रेडिओवरील आणि टीव्हीवरील इंग्रजी बातम्या आपण ऐकल्या पाहिजे. माय मराठीवर प्रेम केले पाहिजे. रोज नियमित शुद्धलेखन करण्याचा सराव करून वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. आज आपण विद्यार्थी आहोत आपली भूमिका ज्ञानग्रहण करणाऱ्याची असली पाहिजे. नंतर आपल्या घरी आपण शेतीत श्रम करणाऱ्यांच्या भूमिकेत असायला हवे. अभ्यास करीत आपल्या पालकांना कामात मदत केली पाहिजे. आपली नाळ सतत शेतीमातीशी जोडून ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करीत विद्यार्थ्यांना श्रममूल्य सांगण्याचे संस्कार चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले. 

त्यांनी अनौपचारिकपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधून नैतिक आचरण व ध्येय निश्चिती या संदर्भात स्वानुभव सांगत मार्गदर्शन केले. श्री ज्ञानेश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने काल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायबर सुरक्षा व बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ या  विषयावर विस्तृत मार्गदर्शनही या वेळी करण्यात आले. 

फेसबुक, व्हाट्सअप, युट्युब  व इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमावर तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिथे बेजबाबदार पणाने वागणारे लोक मोठ्या प्रमाणात गुन्हे करतात, काही लोकांना ब्लॅकमेल करतात. इंटरनेटच्या जाळ्यात आपणास सर्वच लोक अडकलेलो आहोत. इथे अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होते. त्यात अनेक लोक आत्महत्या करतात आणि काही लोक तुरुंगात जातात. विद्यार्थ्यांनी या वयात केवळ अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी कष्ट उपसले पाहिजे, असे प्रतिपादन कम्युनिटी सेलचे पोलीस निरीक्षक रोशन इरपाते यांनी केले. तसेच सायबर हजिन प्रॅक्टिशनर मुजावर युसुफ अली यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाकरे यांनी केले. यावेळी सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महाले, तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण मार्गदर्शन सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार हेमंत मेश्राम यांनी मांडलेक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos