एसटीची ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना, गडचिरोली आगारात सकाळपासूनच गर्दी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
एसटीच्या बनावट कार्डला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.  ही योजना सुरू करण्यात आली असून कार्ड वितरित करण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो जेष्ठ नागरिक सकाळपासूनच गडचिरोली आगारात गर्दी करीत आहेत. सकाळी ७ वाजता पासूनच कार्यालयाबाहेर रांगा दिसून येत होत्या. 
 शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठांना सवलतीचे साधे कार्ड मिळत असल्याने बनावट कार्ड बनवून अनेक जण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली.  नाव नोंदणीवेळी स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल. नोंदणीसाठी वयाचा पुरावा व महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा सोबत आणावा लागणार आहे. त्यात वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अशा कोणत्याही पुराव्यांपैकी एक आणि आधारकार्ड गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी आगारातील आरक्षण खिडकीवर करण्यात येणार आहे. अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेवून आधार कार्डशी संलग्न माहिती दिल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणीच कार्ड मिळेल.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-20


Related Photos