धक्कादायक ! चीनमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी अल्पसंख्याक समुदायातील कैद्यांची कत्तल


वृत्तसंस्था /  बीजिंग :  चीनमध्ये खळबळजनक माहिती समोर आली असून अवयव प्रत्यारोपणासाठी अल्पसंख्याक समुदायातील कैद्यांची कत्तल केली जात आहे. लंडन येथील चीनी लवादाने आपल्या अहवालात अवयव मिळवण्यासाठी फालुन गोंग आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना ठार केले जात असल्याचे म्हटले आहे.
चीनी लवादाचे अध्यक्ष सर जिओफ्रे नाईस क्यूसी यांनी चीनमध्ये अवयवांसाठी कैद्यांना भयंकर पद्धतीने ठार केले जात असल्याचे व सगळ्यांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच या कैद्यांचे अवयव जबरदस्तीने काढल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नसला तरी कैद्याचे अवयव काढणे बंद झाल्याचेही पुरावे हाती लागले नसल्याचे क्यूसी यांनी अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञ, मानवाधिकार तपास अधिकारी यांनी केलेल्या तपासात अल्पसंख्याक फालुन गोंगचे सदस्य असलेल्या कैद्यांचीच हत्या करून त्यांचे अवयव काढले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र यात तिबेटी, मुस्लीम नसलेले आणि ख्रिश्चन कैदीही होते हे आताच सांगता येणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
१९९९ साली फालुन गोंग या समुदायात लाखो नागरिक समाविष्ट होऊ लागल्याने या समुदायाचा दबदबा वाढला होता. यामुळे चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला ही धोक्याची घंटा वाटू लागली. यामुळे या समुदायाच्या कैद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ लागली. पण २०१४ साली मृत्यूदंडाची शिक्षा होणाऱ्या कैद्यांचे अवयव काढण्याची प्रक्रिया बंद करण्यात आल्याची घोषणा चीन सरकारने केली. पण लंडनमधील चीनी लवादाने अहवालात ही प्रक्रिया अदयाप सुरू असल्याचा दावा केला आहे.   Print


News - World | Posted : 2019-06-20


Related Photos