खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / नागपूर : 
अंधारात खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री रामटेक तालुक्यात घडली. रात्री दहाच्या सुमारास हा बिबट विहिरीत पडला असावा अशी माहिती वन विभागाने दिली आहे. 
रामटेक तालुक्यातील घुकसी गावाजवळहल आर. एस. पोल्ट्री फार्मजवळील खासगी क्षेत्रातील एका खोल विहिरीत मंगळवारी रात्री बिबट पडल्याची माहिती तेथील चौकीदाराने वन विभागाला दिली. ही माहिती मिळताच रामटेक वनपरिक्षेत्राचे अधिकारी भोंगाडे व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वन कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे रात्रीच प्रयत्न सुरू केले. रात्रीची वेळ आणि खोल विहीर यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळे, बुधवारी सकाळी बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. वन्यप्राणी बचाव केंद्र नागपूरच्या चमूला देखील या कामाकरिता पाचारण करण्यात आले. 
दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून बिबट्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, तो आधीच मृत झाल्याचे लक्षात आले. वन्यप्राणी बचाव केंद्र येथे बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते, सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.एम.धूत, डॉ. मेघा कावरे, डॉ. सुबोध नंदागवळी, डॉ. अंकुश दुबे, डॉ. सय्यद बिलाल उपस्थित होते. नागपूरचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे, वनरक्षक एस. एस. राठोड, एम.एम.गोतमारे हे पुढील तपास करीत आहेत.   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-20


Related Photos