महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केली सामान्य रुग्णालयाची पाहणी


- दुरुस्तीची कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज ६ ऑक्टोबर ला जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात असलेल्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी भरती असलेल्या रुग्णांसोबतही संवाद साधला.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यांना वेळेवर औषधोपचार व इतर आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. रुग्णालयातील डागडूजी तसेच काही दुरुस्तीची कामे असल्यास त्वरीत पूर्ण करावी. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी परिसरात शेड उभारावे. अतिदक्षता विभागात अत्याधुनिक सोयी उपलब्ध राहण्यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने करा. तसेच नवजात शिशु कक्षात विद्युतीकरणाचे काम संबंधित यंत्रणेने पूर्ण करून अहवाल सादर करावा. डायलिसीस युनीटचे काम व इतर बांधकाम असल्यास प्राधान्याने ही कामे करून घ्यावी. रुग्णालयाची स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय आहे, याकडे दुर्लक्ष करू नका, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

रुग्णालयाच्या डागडूजी व दुरुस्तीकरीता किती निधीची मागणी केली, आणखी निधी आवश्यक असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. तसेच मंजूर निधी किती, उपलब्ध निधीतून कोणकोणती कामे करण्यात आली, आदींबाबत त्यांनी विचारणा केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी पुरुष सर्जरी वॉर्डात रुग्णांशी संवाद साधला. जेवण वेळेवर आणि व्यवस्थित मिळते का, किती दिवसांपासून दवाखान्यात भरती आहात, डॉक्टर नियमित येतात का, आदी माहिती त्यांनी जाणून घेतली.

आंतरवासिता डॉक्टरांशी संवाद : तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्यामुळे संपावर असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांशी जिल्हाधिका-यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंतरवासिता डॉक्टरांचे प्रलंबित वेतन देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यात आले आहे. एक-दोन‍ दिवसांत वेतन अदा होईल, असे त्यांनी संपकरी डॉक्टरांना आश्वस्त केले. तसेच तातडीने कोषागार अधिका-यांशी दूरध्वनीवर संवाद साधून संबंधितांच्या खात्यात वेतन जमा करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या. यापुढे वेतन प्रलंबित राहणार नाही, नियमित वेतन देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सुचना करण्यात येतील. डॉक्टरांनी संप मिटवून त्वरीत कर्तव्यावर हजर व्हावे व रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

विविध विभागांची पाहणी : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग, पुरुष सर्जरी वॉर्ड, स्त्री रोग विभाग, प्रसुती पश्चात व सिझेरीयन कक्ष, बालरोग कक्ष, नवजात शिशु अतिदक्षता कक्ष व इतर विभागाची पाहणी केली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र सुरपम, डॉ. अशोक गजभिये, डॉ. प्रशांत गजभिये आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos