महत्वाच्या बातम्या

 आणखी एक नवी ट्रेन प्रवाशांच्या सेवेत : रविवारपासून धावणार नागपूर - शहडोल एक्सप्रेस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रविवारपासून ही नवीन ट्रेन सुरू होणार असून, त्यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

छत्तीसगड-मध्य प्रदेशला लागून असलेल्या नागपूर शहरात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने येथे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात. पाहिजे त्या प्रमाणात रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याने ही मंडळी ट्रॅव्हल्स किंवा खासगी प्रवासी वाहनांनी नागपुरात येतात. त्यासाठी त्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. खास करून सौसर, छिंदवाडा, शिवनी, नैनपूर, जबलपूर आणि अन्य काही जिल्ह्यातील मंडळींची नागपुरात येण्याची संख्या मोठी आहे.

ते लक्षात घेऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावर नवीन ट्रेन सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता ११२०१/ ११२०२ नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन ट्रेन सुरू करण्यात आली आहे. रविवारी ८ ऑक्टोबरपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. परिणामी विदर्भातील आणि त्याहीपेक्षा जास्त मध्य प्रदेशातील नागरिकांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

असे आहे वेळापत्रक : 

नागपूरहून ही ट्रेन रोज सकाळी ८ वाजता सुटेल आणि रात्री १० वाजता शहडोलला पोहचेल. तर , शहडोल येथून रोज पहाटे ५ वाजता ती नागपूरसाठी निघेल आणि सायंकाळी ६ वाजता नागपूर रेल्वे स्थानकात दाखल होईल. या मार्गातील साैंसर, छिंदवाडा, शिवनी, नैनपूर, जबलपूर, कटनी दक्षिण, उमरिया येथे या गाडीचे थांबे राहतील. ७ स्लिपर कोच, ५ जनरल, २ एसएलआर ब्रेकव्हॅन्स, ३ थ्री एसी तर, १ टू एसीचे कोचही या गाडीत राहतील.

अन् अखेर सुरू झाली :

विशेष म्हणजे, ही गाडी गेल्या महिन्यात सुरू करण्याची घोषणा झाली होती. त्यानुसार, एक दिवस ती धावलीही मात्र दोनच दिवसांत तिला ब्रेक लावण्यात आला. पुढच्या काही दिवसानंतर ही गाडी सुुरू करण्यात येईल, अशी त्यावेळी घोषणा करण्यात आली होती. आता मात्र रविवारपासून तिचे संचालन सुरू केले जाणार आहे. गुरुवारी ५ ऑक्टोबरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी या गाडी (ट्रायल)ला शहडोल स्थानकावर हिरवी झेंडी दाखवली.





  Print






News - Nagpur




Related Photos