महत्वाच्या बातम्या

 विशेष शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान

- अभियानांतर्गत १३ आँक्टोंबरला विशेष शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानांतर्गत आयोजित शिबिरात मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांगांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ द्या. त्यासाठी चांगले नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताडे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, सुनील मेसरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, तहसिलदार रमेश कोळपे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे, माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी उषा तळवेकर, दिव्यांग संघटनेचे संजय जाधव आदी उपस्थित होते.

दिव्यांगासाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ दिव्यांना देण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ५ ते ७ हजार दिव्यांग लाभार्थी उपस्थित राहणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी तालुकास्तरावरुन बसने येणाऱ्या दिव्यांगांसाठी परिवहन महामंडळाने बसेसची व्यवस्था करावी. यासोबतच रुग्णवाहिका, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन ठेवाव्यात, अशा सूचना राहुल कर्डिले यांनी दिल्या.

दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी एनएसएस, एनसीसी, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करावी. दिव्यांगांसाठी विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संबंधित विभागांनी आपल्या योजनांची दिव्यांगांना माहिती व्हावी. यासाठी शिबिरस्थळी स्टॉल लाऊन दिव्यांगाना योजनांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. शिबिरामध्ये विविध दाखल्यासाठी नोंदणी केलेल्या दिव्यांगांना वेळीच प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्यास घरपोच प्रमाणपत्राचे वितरण करण्याची सुचनाही यावेळी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

आरोग्य विभागाने दिव्यांग नोंदणी करुन दिव्यांगत्वाची तपासणी करुन घ्यावी. दिव्यांग लाभार्थ्यांना आपले सेवा केंद्र चालवावयाचे असल्यास त्यांनी तसा जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज केल्यास आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी देण्यात येईल. दिव्यांगांनी शिबिरास येतांना दिव्यांग ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी असे आवाहनही यावेळी कर्डिले यांनी केले. शिबिरात दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागांसह दिव्यांग संघटनांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos