महत्वाच्या बातम्या

 सामुहिक व नोंदणीकृत विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांना मुलींच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये. याकरीता त्यांनी कर्ज घेऊ नये यासाठी शासनाने मुलींचा विवाह नोंदणीकृत किंवा विवाह सोहळ्यात विवाह करण्याकरीता अनुदान योजना सुरु केली आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांना  मुलींनी नोंदणीकृत विवाह केल्यास किंवा विवाह सोहळ्यात विवाह केल्यास मुलींच्या पालकास विवाहाचा खर्च भागविण्यासाठी १० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थाना प्रति जोडप्यामागे २ हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधुच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे. शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिला कुटूंबातील वधूचा नोंदणीकृत विवाह करणाऱ्या पालकांनी लग्नाच्या एक महिनापूर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच सामुहिक विवाह  योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या वधूच्या पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह योजना राबविणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांकडे करावयाचा आहे.

स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेले अर्ज एकत्रित करुन प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos