महत्वाच्या बातम्या

 गरजू महिलांना महिला सक्षमीकरण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती या एकछत्री योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण ही एक घटक योजना राबविण्यात येत आहे. या महिला सक्षमीकरण केंद्राचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेची अंमलबजावणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सदर महिला सक्षमीकरण केंद्र जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आत धर्मशाळेच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील आलेल्या प्रवेशित गरजू लाभार्थी महिलांना आरोग्य सेवा, उच्च प्रतीचे शिक्षण, व्यावसायिक कारकिर्द, व्यावसायिक समुपदेशन, वित्तीय नियोजन, उद्योजकता, बँकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस, कामगार वर्गाचे आरोग्य व सुरक्षितता आणि डिजिटल साक्षरता क्षेत्रात विविध संस्थात्मक स्तरावर योजनाबध्दरित्या सक्षम करण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरण केंद्राद्वारे मार्गदर्शन  करण्यात येतात. 

शासकीय कार्यक्रमात नाव नोंदणी करण्यासाठी महिलांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षण, आधारकार्ड, मनेरगा नाव नोंदणी करणे यासारखी लागणारी कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात येते.

केंद्रामध्ये येणाऱ्या प्रवेशित लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी सध्यास्थितीत वन स्टॉप सेंटर येथील केंद्र प्रशासक यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु आहे. सर्व सामाजिक कायकर्ते, शासकीय व अशासकीय संस्थांनी शासनाच्या या योजनेची माहिती जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवरील गरजु महिलांपर्यंत पोहाचवावी, असे महिला सक्षमीकरण केंद्राच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. गरजु महिलांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या १८१ या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos