काळी - पिवळी वाहन पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थिनींसह सहा जण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव काळी - पिवळी  पुलावरून नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात साकोली ते लाखांदूर मार्गावरील कुंभली गावाजवळील चुलबंद नदीवर आज मंगळवारी दुपारी ३.३० वाजता घडला. मृतांमध्ये चार विद्यार्थिनी असून बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या. 
शीतल सुरेश राऊत (१२), अश्विनी सुरेश राऊत (२२) दोघीही राहणार सानगडी, शिल्पा श्रीरंग कावळे (२०), शारदा गजानन गोटफोडे (४५) दोघेही राहणार सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (२०) रा.सासरा टोली आणि गुनगुन हितेश पालांदुरकर (१५) रा.गोंदिया अशी मृतांची नावे आहेत. तर वंदना अभिमन सतीमेश्राम (५०), डिंपल श्रीरंग कावळे (१८), अभिमन तातोबा सतीमेश्राम (४५) तिघेही राहणार सासरा, शुभम नंदलाल पातोळे (२०) रा.तई, विणा हितेश पालांदूरकर (३०), सिद्धी हितेश पालांदुरकर (५) दोघेही राहणार गोंदिया आणि मालन तुळशीराम टेंभुर्णे (६५) राहणार खोलमारा जैतपूर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी वंदना, डिंपल व शुभमची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.
साकोली येथून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप (क्रमांक एमएच ३१ एपी ८२४१) लाखांदुरकडे मंगळवारी दुपारी जात होती. कुंभली येथील चुलबंद नदीपुलावर समोरुन आलेल्या वाहनाने काळीपिवळी जीपला डॅश दिला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप थेट ४० फुट खोल चुलबंद नदीच्या पात्रात कोसळली. अपघाता एवढा भीषण होता की, काळीपिवळीचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साकोलीचे ठाणेदार बंडोपंत बनसोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.    Print


News - Bhandara | Posted : 2019-06-18


Related Photos