एकोना मायनिंगची अवजड वाहतूक मोहबाळा ग्रामस्थांनी रोखली


- शेतकऱ्यांच्या शेतातून कोळसा वाहतुकीने  शेतीचे प्रचंड नुकसान 
- जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचे हित जोपासावे - ग्रामस्थांची  जुनीच मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा
: मागील तीन - चार दशकांपासून  वनोजा ते नायगाव - मोहबाळा रस्त्याची मागणी कडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. याच कच्च्या रस्त्यावर  अतिक्रमण करून प्रसंगी शेतकऱ्यांच्या शेतातून ट्रक वाहतूक करून एकोना मायनिंग एमआयडीसी परिसरातील कंपनीला कोळसा पुरवीत आहे. एकोना मायनिंगच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सेवा-सुविधा पूरविण्याऐवजी कच्च्या रस्त्यावर  मुरूम व दगडाच्या तुकडे टाकूण शेतकऱ्यांची वाट अडविण्याचा प्रयत्न होत आहे. एकोना मायनिंगच्या मनमानीने शेतकऱ्यांच्या शेतीला प्रचंड फटका बसून  त्यांच्यावर उपासमारीची वेळ  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वारंवार जिल्हा प्रशासन वेकोलि प्रबंधन लक्ष वेधून ही कारवाई होत नसल्याने सोमवारी सकाळी  ग्रामस्थांनी मायनिंगचे ट्रक रोखून धरले. या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. 
     वरोरा तालुक्यातील एमआयडीसी परिसरात जी.एम.आर , वर्धा पावर व अशा छोट्या-मोठ्या अनेक कंपन्या कार्यरत आहे.  कंपनीला लागूनच काही अंतरावर  दहेगाव, मोहबाळा, नायदेव  इ. खेडे आहेत. वनोजा टी पॉइंट  ते मोहबाळा -दहेगाव रोडच्या जोड रस्त्यापर्यंत अप्रोच (कच्चा )रोड आहे.  जो अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. याच मार्गावरून शेतकरी आपल्या शेतात येणे - जाणे  करतात. शासनाने या ५ की. मी. रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणी साठी मागील तीन चार दशका पासून ग्रामस्थ संघर्ष करीत आहे. परंतु जिल्हा प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.  वरोरा परिसरात  एकोना मायनिंग आहे. एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना कोळसा पुरविण्यासाठी एकोना मायनिंगला या रस्त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून  वेकोली तर्फे रस्ता वापरण्यासाठी  शासनाच्या  विना परवानगी ने मुरूम व दगडाचे लहान मोठे तुकडे कच्चा रोडवर आणून टाकण्यात आले आहे. या मार्गावरून व प्रसंगी शेतकऱ्यांच्या शेतातून कोळश्याने भरलेले  ट्रक कंपनीत नेण्यात येतात. रस्त्यावर मुरूम टाकल्याने, वाहनाच्या वर्दळीमुळे सततची धूळ उडत असून या मुळे ग्रामस्थांना श्र्वसनाचा त्रास उद्भवत आहे. दगड मुरुमाने रस्ता ब्लॉक झाला असून पावसाचे पाणी शेतातच साचून  खरीप पीक धोक्यात येण्याची  दाट संभावना आहे ,असे झाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येवू शकते. शासनाने वेळीच यावर आवर घालावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंपनीची  पाईप लाईन आहे. सोबतच या कच्च्या रस्त्यावर पुलाचे निर्माण करण्यात आले असून या पुलाची भार सहन क्षमता खूप कमी असून सुद्धा त्यावरून सतत अवजड वाहनांची ये - जा होते. त्यामुळे अवजड वाहनांच्या भारामुळे पुल कोसळण्याची भीती  नाकारता येत नाही. एकोणा मायनिंग ने  आपल्या निधीतून  ग्रामस्थांसाठी विशेष सोयी सुविधा पुरवाव्यात या करिता एकोना मायनींगच्या वरिष्ठ  कार्यालय, क्षेत्रीय महाव्यवस्थापक माजरी क्षेत्र,कुचना वेकोली ला. मोहबाळा ग्राम पंचायत मार्फत निवेदन देण्यात आल्याचे कळते. या संदर्भात सोमवार १७ जून ला ग्रामपंचायत मोहबाळा  येथे सकाळी  मायनिंग अधिकारी व आसपासचे ग्रामस्थ यांची एक बैठक ही होती परंतु अपेक्षेनुरूप परिणाम निघाला नाही . ग्रामस्थ यांच्या मागणी कडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षमुळे शेतकरी चिंतेत  पडला आहे. वेकोली ने या कच्च्या मार्गाचा वापर करून शेतकऱ्याची वाट लावली  आहे.  वारंवार प्रशासन व वेकोलि यांच्याशी  संवाद साधला नंतरही समाधानकारक तोडगा निघाला नाही. वेकोलीच्या ट्रक ने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रशासन ग्रामस्थांच्या मागणी कडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मायनींगचे ट्रक रोखून धरले. जो पर्यंत कच्च्या रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद होत नाही तोवर आम्ही आंदोलन करताच राहू  असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.                       यावेळी ग्रामपंचायत मोहबाळा येथील माजी सरपंच जंयत टेंमुर्डे , दहेगाव सरपंच विशाल पारखी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, व गावकरी इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन ग्रामस्थांच्या समस्याचे निराकरण करावे अशी मागणीही त्यांनी केली .
बैठकीला उपस्थित वेकोलि एकोना कोळसा खदान प्रबंधक यांच्याशी  ग्रामस्थांच्या मागण्या  संदर्भात विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-18


Related Photos