लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ओम बिर्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  /  नवी दिल्ली :
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोठ्या नावांवर फुली मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांचं नाव निश्चित केलं आहे. बीजू जनता दल व वायएसआर काँग्रेसनं बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दिल्यानं त्यांच्या नावाची घोषणा ही केवळ औपचारिकता उरली आहे. 
बिर्ला हे राजस्थानमधील दक्षिण कोटा येथून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी, ते तीनदा विधानसभा सदस्य देखील राहिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत बिर्ला यांनी काँग्रेसचे रामनारायण मीणा यांचा २ लाख ७९ हजार मतांनी पराभव केला आहे. बिर्ला यांची राजस्थानात पर्यावरणप्रेमी अशी ओळख आहे. 'ग्रीन कोटा' अभियानांतर्गत त्यांनी आजवर अनेक लोकांना वृक्षारोपणासाठी प्रेरित केलं आहे. पर्यावरणाबाबत ते सतत जागरूक असतात. त्या संदर्भातील कार्यक्रमांमध्ये हिरीरीनं सहभागी होतात. 
लोकसभा अध्यक्षपदासाठी मनेका गांधी, राधामोहन सिंह, एस. एस. अहलुवालिया यांच्यासह अनेक नावांची चर्चा होती. मात्र, मोदींनी पारंपरिक संकेतांना फाटा देत बिर्ला यांचं नाव निश्चित केलं आहे. सर्वसाधारणपणे लोकसभा अध्यक्षपदासाठी ज्येष्ठता विचारात घेतली जाते. मात्र, यापूर्वी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले मनोहर जोशी व दोनवेळा खासदार झालेले जी. एम. सी. बालयोगी यांनाही अध्यक्षपद देण्यात आलं होतं. ५७ वर्षीय बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष झाल्यास ते आठवेळा खासदार राहिलेल्या माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची जागा घेतील.   Print


News - World | Posted : 2019-06-18


Related Photos