आज भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प


प्रतिनिधी /  मुंबई :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडला जाणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दुपारी दोन वाजता विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील. त्याचवेळी वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर हे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 
 दुष्काळामुळे राज्याचा कृषी विकास दर ०.८ टक्क्यांवरून तब्बल उणे आठ टक्क्यांवर घसरला असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एकाबाजूला कृषी क्षेत्राची पिछेहाट होत असताना दुसऱ्या बाजूला कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात ०.४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीही साडेसात टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडला जाणार आहे. 
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गती सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षाइतकीच अपेक्षित असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट केले आहे. राज्यात अन्नधान्य, तेलबिया व कापसाच्या उत्पन्नात अनुक्रमे १५ टक्के, १७.७ टक्के, आणि ४३.३ टक्के इतकी घट झाली आहे, तर ऊस, फळे आणि भाज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. राज्याच्या डोक्यावरील कर्ज मात्र २०१८-१९ या वर्षात चार लाख १४ हजार ४११ कोटी रुपये इतके आहे. ते राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत १५.६ टक्के आहे. गेल्या वर्षी राज्यावर चार लाख दोन हजार ४२१ कोटी रुपयांचे कर्ज होते. राज्याचे दरडोई उत्पन्न २०१८-१९ या आर्थिक वर्षात एक लाख ९१ हजार ८२७ रुपये अपेक्षित असून ते सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ८.९ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिली आहे. 
राज्याचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी विधिमंडळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. २०१८-१९ या वर्षात राज्यात कमी पाऊस पडल्यामुळे कृषी आणि संलग्न क्षेत्रात ०.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. तर, उद्योग क्षेत्रात ६.८ टक्के आणि सेवा क्षेत्रात ९.२ टक्के वाढ अपेक्षित आहे. या वर्षात राज्याचे स्थूल राज्य उत्पन्न २६ लाख ६० हजार ३१८ कोटी रुपये असेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-18


Related Photos