महत्वाच्या बातम्या

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले विमा कंपन्यांना निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीचा आढावा घेतला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश एकनाथ शिंदेंनी यावेळी विमा कंपन्यांना दिले.

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त असून त्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असे सांगून विमा कंपन्यांनी देखील याकाळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याची भूमिका संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. यामागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी, असे मंत्री धनंजय मुंडे, दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. खरीप २०२३ मध्ये प्रधानमंत्री पिकविमा योजनेसाठी १ कोटी ७० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. ११३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनिव्हर्सल सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडलम एम एस. भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी एगो, रिलायन्स जनरल या विमा कंपन्या राज्यात कार्यरत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos