वीज जोडणी मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने मंत्र्यांसमोरच केले विष प्राशन


वृत्तसंस्था / बुलडाणा :  पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने चक्क ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर विष घेऊन आत्महदहनाचा प्रयत्न केला.  ईश्वर खुपराव खराटे (रा. वडोदा), असे शेतकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रुग्णालयात हलवले.  मलकापूर येथे चैनसुख संचेती यांच्यावतीने आयोजित कृषी प्रदर्शनात ही खळबळजनक घटना १५ जून रोजी सायंकाळी घडली.
बुलडाणा जिल्ह्यातील ईश्वर खुपराव खराटे यांच्याकडे वडोदा गावात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. यामध्ये वडिलोपार्जित विहीर आहे. शेतीजवळच विद्युत खांब आणि जवळच डीपी असून ईश्वर खराटे यांचे आजोबा श्रीराम खुपराव खराटे यांनी विद्युत कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज करून १६ डिसेंबर १९८० साली ५५५ रुपयांचे डिमांडही भरले. त्याची प्रत सध्या ईश्वर खराटे यांच्याकडे आहे. आजोबा श्रीराम खराटे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ईश्वर यांचे वडील खुपराव खराटे यांनी पाठपुरावा केला. तरीही कनेक्शन मिळाले नाही. दोन पिढ्याला महावितरणकडून शेतीत विद्युत कनेक्शन मिळाले नाही. आता तिसऱ्या पिढीतील ईश्वर खराटे हेही गेल्या अनेक वर्षांपासून कनेक्शन मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी एप्रिल २००६ मध्ये सात दिवस शेतीत कनेक्शन मिळावे यासाठी उपोषणही केले आहे. मलकापूर कार्यालयाने कनेक्शन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले होते. यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्या शेतात अद्यापर्यंत कनेक्शन मिळाले नाही. म्हणून खराटे यांनी कनेक्शन न मिळाल्यामुळे झालेल्या ५० ते ६० लाख रुपयांच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने महावितरणला एका निवेदनाद्वारे १५ जूनपर्यंत भरपाई व वीज कनेक्शन द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणून १५ जून रोजी खराटे यांनी मलकापूर येथे गोविंद विष्णू महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित कृषी समृद्धी या महोत्सवाचा उद्घाटनीय कार्यक्रमात ऊर्जाराज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी खराटे यांना ताब्यात घेतले. प्रथमत: त्यांना मलकापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-17


Related Photos