आज डॉक्टरांचा २४ तासांचा देशव्यापी संप


वृत्तसंस्था / मुंबई  :  कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे डॉक्टरांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कायम असून डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज  सोमवारी संपाची हाक दिली आहे. डॉक्टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी 'आयएमए'चे माजी सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी केली आहे. खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. 
आज, सोमवारी सकाळी सहा वाजता या संपाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारी रुग्णालयांची वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू राहणार असली तरीही या वेळेमध्ये डॉक्टर काम करताना काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्याने रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-17


Related Photos