महत्वाच्या बातम्या

 मुंबई दर्शन घडवणारी ओपन डबल डेकर बसही हद्दपार : उद्या शेवटची फेरी करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राजधानी मुंबईची ओळख समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या जुन्या डबलडेकर बस सेवेतून निवृत्त झाल्या. बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसेसची सेवा १५ सप्टेंबरपासून बंद करण्यात आली, यावेळी मुंबईकर भावुक झाले होते.

त्यानंतर, आता मुंबई दर्शन घडवणारी आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरणारी विना वातानुकूलित ओपन डेक बसही (निलांबरी) गुरुवार, ५ ऑक्टोबरला शेवटचा प्रवास करणार आहे. मुंबईच्या रस्त्यावर मागील २५ वर्षे सेवा देणारी ही बस सेवेतून हद्दपार होत आहे. लवकरच १० नव्या वातानुकूलित ओपन डेक बसची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही बेस्टमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एमटीडीसीच्या मदतीने बेस्टने २६ जानेवारी १९९७ रोजी पहिली विना वातानुकूलित ओपन डेक बस सुरू केली. त्यामध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. या बसमधून पूर्वी पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईमध्ये या बसच्या पर्यटनसेवेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उकाड्यामुळे बदल करण्यात आला. त्यानंतर बसच्या फेऱ्या सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३०पर्यंत होऊ लागल्या.

महिन्याला २० हजार पर्यटक -

महिन्याला साधारण २० हजार पर्यटक याचा आनंद घेत होते. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन ओपन डेक बस होत्या. १६ सप्टेंबरला पहिली, २५ सप्टेंबरला दुसरी आणि ५ ऑक्टोबरला शेवटची बस सेवेतून बंद होत आहे. एका बसचे आयुर्मान हे साधारण १५ वर्षे असते. त्यामुळे मोटर वाहन नियमानुसार ह्या बस आता मोडीत काढल्या जाणार आहेत.

डबल डेकर बसला मुंबईकरांकडून निरोप -

१५ सप्टेंबरला डबल डेकर बसला निरोप देण्यासाठी अनेक मुंबईकर मरोळ बस डेपोत उपस्थित होते. अंकुर नावाच्या डबल डेकर बसच्या चाहत्याने ही खास टॉय बस बनवून आणली होती. यावेळी अंकुरने म्हटले, हा क्षण त्याच्यासाठी खूप भावनिक आहे कारण त्याने आपले संपूर्ण आयुष्य या बसमधून प्रवास केला आहे. याच कारणामुळे तो गेल्या तीन दिवसांपासून दररोज येत असून त्याने यावेळी खास टी शर्ट देखील बनवून घेतले होते.





  Print






News - Rajy




Related Photos