अंतर्गत वादाला आमंत्रण नको म्हणून उपमुख्यमंत्रिपद घेण्यास शिवसेनेचा नकार


वृत्तसंस्था / मुंबई :   राज्य मंत्रिमंडळाचा आज  रविवारी विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळणार आहे. मात्र अंतर्गत वादाला आमंत्रण नको म्हणून उपमुख्यमंत्रिपद घेण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. 
मुंबईतील राजभवनात दरबार हॉलसमोर नव्या मंत्र्यांच्या शपथविधी आज होणार आहे.   आज, रविवारी सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांना शपथ देण्याची वेळ निश्चित झाली आहे. तथापि, नवीन मंत्री कोण आहेत, याची यादी शनिवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झाली नव्हती, अशी माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांनाही एकदिलाने सामोरे जाण्याचे युतीच्या नेत्यांनी ठरविले आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री पदामुळे सेनेत अंतर्गत वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पद घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान शिवसेनेने एका कॅबिनेटसोबत दोन राज्यमंत्रिपदे मिळावीत यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच उत्पादनशुल्क खात्याचा कारभार मिळवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.  शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा दांडगा अभ्यास असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजपचे तीन वेळा आमदार असलेले डॉ. संजय कुटे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून, त्यांच्याकडे कृषी खाते दिले जाण्याची शक्यता आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-16


Related Photos