महत्वाच्या बातम्या

 ७ लाख ४७ हजार विद्यार्थी आधार नोंदणीविना : राज्यात विद्यार्थी लाभाच्या योजना सक्षमपणे राबविण्यास मोठा अडसर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अप अपडेशनबाबत शाळांना वारंवार सूचना दिलेल्या असतानाही शाळांकडून त्याकडे दुर्लक्ष केल जात आहे.

राज्यातील तब्बल ७ लाख ४७ हजार ७२१ विद्यार्थ्यांची अद्यापही आधार कार्डची नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे शासकीय योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून तो पूर्ण खर्च करण्यास अडसरही निर्माण होण्याचा धोका आहे.

शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप, शालेय पोषण आहार, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार शाळांना अनुदान देण्यात येते. बोगस पटंसख्या दाखवून शासनाचा निधी लाटण्याच्या प्रकारांना आळा घातला जावा यासाठी शासनाने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अपडेशनची मोहीम मागील काही वर्षांपासून हाती घेतली.

मात्र, ही मोहीम अद्यापही यशस्वी झालेली नाही. शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती स्टुंडट पोर्टलमध्ये नोंदविण्याची सक्तीही करण्यात आली. यासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली. तरीही आधार नोंदणी व अपडेशनचे काम अपूर्ण राहिलेले आहे. शिक्षण विभागाकडून शाळांच्या मुख्याध्यापकांना बऱ्याचदा सूचनाही देण्यात आल्या. मात्र, त्याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे.

प्रामुख्याने इयत्ता पहिलीला प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नाही. याबरोबरच अन्य वर्गातीलही काही विद्यार्थ्यांचा आधार नोंदणी न केलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी लवकर आधार नोंदणी व अपडेशनचे कामकाज पूर्ण करून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.

विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शाळांची शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे निश्‍चित करण्याबाबतची संच मान्यतेची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे. यामुळे शासनाकडून अनुदान जाहीर होऊनही संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना अनुदानापासून वंचितच राहावे लागणार आहे.

६ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांच्या डेटामध्ये विसंगती -

सरल पोर्टलवरील डेटा व आधार डेटा यात विसंगती आढळून आलेली आहे. यात तब्बल ६ लाख ७२ हजार ८३२ विद्यार्थ्यांचा समावेश असून या डेटाच पडताळणीसाठी युआयडीएआयकडे पाठविलाच नाही. शाळांनी डेटा तपासून त्यात आवश्‍यक त्या दुरुस्त्या करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी पुढील वर्गात गेलेले असतानाही त्यांच्या आधार नोंदणीमधील चुका अद्यापही कायम असल्याची बाबही शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे.

आधार नोंदणी व अपडेशनचा तपशील -

एकूण प्रवेशित विद्यार्थी - २ कोटी ७ लाख ५६ हजार २५ 

आधार कार्डची स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद - २ कोटी ८ हजार ३०४ 

यूआयडीएआयकडे पडताळणीसाठी पाठविलेले आधारकार्ड - १ कोटी ९३ लाख ३५ हजार ४७२ 

पडताळणीत वैध ठरविलेले आधार - १ कोटी ८७ लाख ९२ हजार ३७४ 

पडताळणीत अवैध ठरविलेले आधार - ५ लाख ४३ हजार ९८ 





  Print






News - Rajy




Related Photos