सूर्यडोंगरीच्या दारूविक्रेत्यांना महिलांचा सज्जड दम


-  पोलीस तक्रार करणार : दारूबंदी टिकविण्यासाठी किटाळीच्या महिला एकवटल्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तब्बल आठ महिने दारूविक्री बंद असलेल्या सूर्यडोंगरी गावात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच किटाळी येथील गाव संघटनेच्या महिलांनी गावात दाखल होत विक्रेत्यांना सज्जड दम दिला. दारूविक्री पुन्हा सुरू केल्यास पोलीस तक्रार करणार असल्याचा निर्णय महिलांनी घेतला.
आठ महिन्यापूर्वी इंजेवारी, पेठतुकूम, देलोडा बु, देऊळगाव आणि किटाळी येथील गावकऱ्यांनी मिळून बंद केलेली सूर्यडोंगरीची दारूविक्री खूप गाजली होती. या पाचही गावांनी मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावात दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेत विक्री बंद केली. पण सूर्यडोंगरी गाव याला अपवाद होते. गावात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर होता. त्यामुळे हे गाव बाकी गावांसाठी डोकेदुखी ठरले होते. परिणामी या पाचही गावांतील लोकांनी सूर्यडोंगरी येथील दारूविक्री बंद करण्यासाठी मोठी बैठक घेत आरमोरी पोलीस स्टेशनवर धडक दिली. लोकांचा निर्धार पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, उपविभागीय दंडाधिकारी विशाल मेश्राम यांनी सूर्यडोंगरी गावात त्याच रात्री बैठक घेत विक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याविषयी अल्टिमेटम दिला होता. विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सूर्यडोंगरीची दारूविक्री थांबली. ही पाचही गावे नजर ठेवून होतीच.
पण आठ महिन्यांनी येथील दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची माहिती किटाळीच्या महिलांना मिळाली. दारू गाळून त्याची बाहेर तस्करी केली जात असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महिलांनी गुरुवारी सूर्यडोंगरी गाव गाठत विक्रेत्यांना दम देत विक्री बंद करण्यास सांगितले. आरमोरी पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. नव्याने पुन्हा दारूविक्री सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार किटाळी येथील महिलांनी व्यक्त केला. पोलीस कधी कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-15


Related Photos