शेतकऱ्यांच्या उत्पन वाढीसाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वीर बाबुराव सेडमाके कृषी मेळाव्यांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढावे याकरिता  पोलीस अधिक्षक  शैलेश बलकवडे  यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात कृषी विभागाच्या सहकार्याने 'वीर बाबुराव सेडमाके कृषी मेळावे' भरवले जाणार आहेत.
  सदर मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या धान लागवडी हंगामपूर्वी धान लागवडीच्या पद्धती व मशागतीच्या पद्धती,आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेती मशागतीच्या विविध पद्धती,बी-बियाणे याविषयीची माहिती  दिली जाणार आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील नागरिकांकरिता शासनाच्या विविध योजना व उपलब्ध अनुदान यांची माहिती दिली जाणार आहे.तसेच शेती क्षेत्राला पूरक असणारे जोडधंदया विषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
 यापूर्वी उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पोमके पेरिमेलीचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या हद्दीतील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना धान पिकाविषयी स्वतः फिल्डवर जाऊन मार्गदर्शन केल्याने तेथील शेतकऱ्यांचे उत्पन भरघोस  वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.याच प्रकारे जिल्ह्यातील इतर भागातील शेतकऱ्यांकरिता देखील विशेष कृषी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल.
 गडचिरोली जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.आगामी धान लागवडीच्या हंगामपूर्वी होणाऱ्या कृषी मेळाव्यांचा गडचिरोलीतील शेतकरी बांधवाना नक्कीच फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी या कृषी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन  पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे   यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-15


Related Photos