आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते एन. चंद्राबाबू नायडू यांची विमानतळावर तपासणी


वृत्तसंस्था / गन्नवरम :  तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख , आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते एन. चंद्राबाबू नायडू यांची सत्ता जाताच त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यांची शुक्रवारी मध्यरात्री गन्नवरम विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाण्यासाठी त्यांना व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य प्रवाशांसारखे बसमधून प्रवास करावा लागला. या घटनेमुळे टीडीपीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. भाजप आणि वायएसआर काँग्रेस सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप टीडीपीने केला आहे. 
तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू यांना विमानापर्यंत जाण्यासाठी व्हीआयपी वाहनाची परवानगी नाकारण्यात आली. चंद्राबाबू नायडू यांना विमानतळावर दिलेली वागणूक ही अपमान करणारी आहे. नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांना ही वागणूक कशी काय दिली?, असा सवाल टीडीपी नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा यांनी केला आहे. नायडू यांना याआधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. नायडू यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. चंद्राबाबू नायडू हे माओवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. नायडू यांच्या ताफ्यातील दोन गाड्या कमी करण्यात आल्याचा आरोपही टीडीपीने केला आहे.   Print


News - World | Posted : 2019-06-15


Related Photos