महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठरतेय रूग्णांना संजीवनी, ७८८० रूग्णांना विविध शस्त्रक्रियांचा लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
शासनाच्या वतीने राबवली जाणारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. या योजनेमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
दारिद्र्यरेषेखालील नागरीकांना विनामुल्य शस्त्रक्रिया तसेच आजारावर उपचार करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने २ जुलै २०१२ पासुन राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली होती. त्यानंतर १ एप्रिल २०१७ पासुन या योजनेच्या नावात बदल झाले असुन आता ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने राबविली जात आहे.
२३ सप्टेंबर २०१८ पासुन केंद्र शासन व राज्यशासनाने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरवात केली. ही योजना आर्थिक, सामाजिक, जात निहाय जनगणना २०११ च्या आधारावर आहे. या योजनेमध्ये वेगवेगळ्या १३०० प्रकारच्या शस्त्रक्रिया व औषध उपचार समाविष्ट आहेत. या योजनेमध्ये भारतातील ५० कोटी नागरीकांचा ५ लाख रुपयांचा विमा समाविष्ट आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्व दुर्गम भागातील, गरीब असुरक्षित लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांकडे गोल्डनकार्ड किंवा आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. ते काढण्याकरीता लाभार्थी हे जवळच्या आयुष्यमान भारत मदतकेंद्र  आरोग्य मित्र तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, संलग्नित रुग्णालयात जाऊन गोल्डन कार्ड तयार करुन घेण्यात यावे, यासाठी रेशन कार्ड किंवा  प्रधानमंत्री पत्र व ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. या दोन्ही योजनांचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन योजनेचे जिल्हा प्रमुख लिलाधर धाकडे यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos