दारूविक्रेत्यांच्या घरी गाव संघटनेचे धाडसत्र, चार जणांना अटक


- जामगिरी येथे अहिंसक कृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी :
दारूविक्री बंद करण्याची नोटीस देऊनही विक्री करणाऱ्या चार जणांना मुद्देमालासह पकडून जामगिरी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या लोकांनी बुधवारी पोलिसांच्या स्वाधीन केले. राजू कोवे, संतोष गोडबोले, सुखदेव वाढई आणि येमाजी कोडाप अशी विक्रेत्यांची नावे आहेत. चामोर्शी ठाण्यात चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील जामगिरी येथे गाव संघटनेद्वारे दारूविक्रीविरोधात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दारूविक्री बंद करण्याबाबत ठरावही घेण्यात आला आहे. असे असतानाही अनेक जण चोरून लपून दारूची विक्री करतात. या कारणाने गावात भांडणे, वादाचे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे गाव संघटनेच्या लोकांनी मंगळवारी गावातील २१ दारूविक्रेत्यांना दारूविक्री थांबविण्याबाबत नोटीस बजावली. एवढ्यावरच न थांबता बुधवारी या सर्व विक्रेत्यांच्या घरी धाडसत्र राबविले. या कारवाईत राजू कोवे, संतोष गोडबोले, सुखदेव वाढई आणि एमजी कोडाप या चौघांच्या घरी दारूसाठा आढळून आला. तात्काळ चामोर्शी पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. चौघांकडून ८० लिटर दारूसाठा ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी गावात सतत धाड टाकून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी गाव संघटनेने केली. महिला व पुरुष कार्यकर्ते या कारवाईत सहभागी झाले होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos